पुणे, दि. ७- ( विशेष प्रतिनिधी)
(महाराष्ट्र वार्ता ऑनलाईन)
राजगड पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या शिवरे (ता.भोर) येथील गावच्या हद्दीत एका नामांकित कंपनीच्या समोरील गेटमध्ये सोमवारी (दि.६) रात्री सव्वा आठ वाजण्याच्या सुमारास प्रवीण सत्यवान मोरे याच्यावर चार जणांनी मिळून लोखंडी कोयत्याने वार करत निर्घृण हत्या करण्यात आली आहे. या प्रकरणी दशरथ तुकाराम डिंबळे यांनी राजगड पोलीस ठाण्यात आज मंगळवारी फिर्याद दाखल केली आहे. या घटनेने शिवरे परिसरात नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीचा भाचा प्रवीण सत्यवान मोरे (वय २५, मूळ रा. वाण्याची वाडी ता. खंडाळा, जि. सातारा सध्या शिवरे ता. भोर जि. पुणे) यास जुन्या भांडणाचे कारणावरून दत्ता उर्फ चिक्या पुरुषोत्तम लेकावळे, महेश पुरुषोत्तम लेकावळे व इतर त्याचे दोन अनोळखी साथीदार (नाव पत्ता माहीत नाही) यांनी हातात कोयते घेऊन येऊन फिर्यादीचा भाचा प्रवीण याचे मानेवर, डोक्यात, हातावर,कोयत्याने वार करून गंभीर जखमी करून त्यास जीवे ठार मारले आहे. सदर भांडणे सोडवण्यास फिर्यादी हे गेले असता फिर्यादीला सुद्धा आरोपींनी हातावर कोयत्याने मारहाण करून जखमी केले आहे.
सदर मयत इसम प्रवीण सत्यवान मोरे हा २०१७ मध्ये कलम ३०२ गुन्ह्यातील आरोपी असून त्याने विराज भिलारे नावाच्या व्यक्तीचा खून केला होता. तो सध्या येरवडा कारागृह होता. तो ३ जून रोजी येरवडा कारागृह येथून ४५ दिवसांच्या पॅरोलवर सुटलेला होता. तो शिवरे या गावात राहण्यास होता. त्यामुळे हा खून पूर्ववैमनस्यातून झाला असल्याची शक्यता पोलीसांनी व्यक्त केली आहे.
या प्रकरणी राजगड पोलीसांनी आरोपींविरुध्द भादंवि कलम ३०२, ३२४, ३४ अन्वये गुन्हा नोंद केली आहे. पुढील तपास राजगड पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक के.वाय. सागवेकर हे करत आहेत.