भविष्यवेधी ऑनलाईन कार्यशाळेमुळे शिक्षकांत उत्साहाचे वातावरण....सभापती श्रीधर किंद्रे.

Maharashtra varta


कापूरहोळ (वार्ताहर):-.
(महाराष्ट्र वार्ता ऑनलाईन)

      वाबळेवाडी शाळेच्या  धर्तीवर शाळा व शिक्षण प्रक्रिया विकसित करण्यासाठी भविष्यवेधी शिक्षण  
ऑनलाईन कार्यशाळा, शाळा व विद्यार्थी विकसनासाठी उपयुक्त ठरली असून   हे ऑनलाईन प्रशिक्षण प्रत्येक शाळेसाठी व शाळेतील प्रत्येक  शिक्षकांसाठी दीपस्तंभ ठरले असून भविष्यवेधी ऑनलाईन कार्यशाळेमुळे शिक्षकांत उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असल्याचे प्रतिपादन भोर पंचायत समितीचे सभापती  श्रीधर किंद्रे यांनी सांगितले.

भविष्यवेधी शिक्षण  या  विषयावर  भोर तालुक्यातील प्राथमिक शिक्षकांची तीन दिवसीय  ऑनलाईन कार्यशाळा 27 जुलै 2020 ते  29 जुलै 2020 या कालावधीत यशस्वीपणे पार पडली. रोज सकाळी 11 ते दुपारी 2 या वेळेत गुगल मीट या ऍपवर ऑनलाईन पद्धतीने हे प्रशिक्षण घेण्यात आले. त्याचे संनियंत्रण महेंद्र (आप्पा) सावंत व सोमेश्वर भगवान यांनी केले.
    आधुनिक शिक्षण विकसन प्रक्रिया रूजवणे , वाबळेवाडी शाळेच्या धर्तीवर आंतरराष्ट्रीय शाळा व शैक्षणिक दर्जा निर्माण करून भोर तालुक्यातील शाळांचा विकास करणे  या विषयांवर आधारित हे प्रशिक्षण होते.

      या कार्यशाळेस पुणे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष तथा शिक्षण  सभापती रणजित शिवतरे ,भोर पंचायत समितीचे सभापती श्रीधर किंद्रे, पुणे जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी सुनिल कुऱ्हाडे, भोर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी विशाल तनपुरे,भोर पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी के. डी. भुजबळ, डायटचे निलेश घुगे,वाबळेवाडी शाळेचे मुख्याध्यापक दत्तात्रय वारे व त्यांची विद्यार्थी टीम  यांनी ऑनलाईन कार्यशाळेस मार्गदर्शन केले व प्रेरणा दिली.
 
या ऑनलाईन कार्यशाळेत  आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिक्षण  व आंतरराष्ट्रीय शाळा बाबत संकल्पना व कार्यप्रणाली समजावून घेणे,वाबळेवाडी शाळेतील अध्ययन व अध्यापन प्रकिया स्वरूप , विद्यार्थ्यांच्या  100% क्षमतांचा उपयोग करणे,  जगाच्या बदलाची गती व  आधुनिक शिक्षण प्रक्रिया  बदलाची गती जाणून घेऊन विद्यार्थी विकास साधणे,वाचन साहित्य निर्मिती उपयोगाबाबत  मार्गदर्शन व विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक  साहित्य निर्माण करणे,
 स्व पातळी , समाज आणि प्रशासन पातळी समजावून घेणे, वर्ग रचना आणि शिक्षक भूमिका, मुलांच्या जिज्ञासा वृत्ती चा सन्मान करणे, आंतरराष्ट्रीय वाबळेवाडी येथील शाळेतील शिक्षक आणि विद्यार्थ्यांशी चर्चा व संवाद साधणे,आधुनिक तंत्रज्ञानात शिक्षक व विद्यार्थी भूमिका, तसेच शाळेतील विद्यार्थ्यांची 100 टक्के उपस्थिती व  पटनोंदणीबाबत मार्गदर्शन, प्रत्येक इयत्तेतील विविध विषयांतील किमान अध्ययन क्षमता प्राप्त बाबत मार्गदर्शन व उपाययोजना, अध्ययन व अध्यापन प्रकिया परिणामकारक व आनंददायी करण्याबाबत मार्गदर्शन व उपक्रमाबाबत चर्चा, शाळेतील विविध शालेय व सहशालेय व आधुनिक उपक्रमाबाबत चर्चा, आदी बाबींवर आधारित हे प्रशिक्षण होते .

 तालुकास्तरीय प्रशिक्षणासाठी तीन टप्पे करण्यात आले आहेत. त्यापैकी प्रथम टप्प्यात 250 शिक्षकांची निवड केलेली होती. भोर तालुक्यात  एकूण 704 शिक्षक आणि 14 केंद्रप्रमुख असे 714 जण  कार्यरत आहेत. प्रत्येक केंद्रातील पहिल्या टप्प्यात  33 टक्के शिक्षक कार्यशाळेस ऑनलाईन उपस्थित होते. सदर प्रशिक्षणासाठी भोर तालुक्यातील शिक्षक प्रथमच ऑनलाईन पद्धतीने  उपस्थित राहीले. गुगल मीट लिंक प्रशिक्षणाच्या आदल्या दिवशी देण्यात आली होती. तसेच सर्व उपस्थित शिक्षकांची ऑनलाईन उपस्थिती तंत्रज्ञानाचा वापर करून उपस्थितीची नोंद घेण्यात आली. 
         अशाप्रकारे कोरोना संक्रमण काळात सोशल डिस्टंसिंगचे पालन करून ऑनलाईन पद्धतीने कार्यशाळा आयोजित करून पार पाडण्याचा हा भोर तालुक्याचा पहिलाच प्रयोग १००% यशस्वी झाला.
To Top