भोर ( प्रतिनिधी):
भोर तालुक्यामध्ये परतीच्या पावसाने भातपिक,सोयाबीन टोमॅटो,ऊस तसेच नुकतीच पेरलेल्या ज्वारीला पिकास मोठा फटका बसला आहे.सरकारने नुकसानीचे पंचनामे करून नुकसानभरपाई द्यावी ,अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत असताना दि.12 रोजी नुकसानीचे पंचनामे कृषी विभाग व महसूल विभाग भोर यांच्या वतीने करण्यात आले.
भोर तालुक्यात शनिवारी दि. 10 रोजी झालेल्या वादळी पावसामुळे भोर आणि वेल्हे तालुक्यातील मुख्य पीक इतर पिकांचे फळभाज्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. पुणे -सातारा महामार्ग गावांना मधील भातशेतीचे वादळी पावसामुळे मोठे नुकसान झाले आहे.
हातातोंडाशी आलेल्या सोयाबीन,भात, ऊस पिकाचे अतोनात नुकसान झाले आहे. भोर व वेल्हे तालुक्यातील काही शेतकऱ्यांनी पीक विमा उतरवला आहे. विमा कंपनीने पंचनामे करून भरपाई द्यावी अशी मागणी भोर पंचायत समिती सदस्य रोहन बाठे यांनी केली आहे.)
नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांनी नुकसानभरपाई साठी कृषी व महसूल विभाग, भोर यांच्याशी संपर्क साधून पंचनामे करून घेण्याची विनंती वेळू मंडलाधिकारी विद्या गायकवाड व वरवे चे तलाठी किशोर पाटील यांनी केली आहे.
कृषी सहायक सुनील गुरव,शिशुपाल,माधुरी दिघे,तलाठी गाडे ,आंबेकर यांनी पंचनामे केले. त्यानी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन वेळू व वरवे परिसरात नुकसान ग्रस्त भागाची पाहणी करून पंचनामे केले आहे.
नुकसानग्रस्त गावांमध्ये नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश कृषी विभागाला दिले असून पंचनामे सुरू आहेत. अशी माहिती कृषी अधिकारी हिरामण शेवाळे व नसरापूर मंडलाधिकारी राजेंद्र डोंबाळे यांनी दिली आहे.