आदेश रद्द न केल्यास माहिती भरण्यास शिक्षकांचा बहिष्कार- :- बाळकृष्ण तांबारे.
पुणे (प्रतिनिधी)
(न्यूज वार्ता ऑनलाईन)
राज्यातील शिक्षक ऑनलाईन अध्यापना बरोबरच कोविड १९ मुळे उद्भवलेल्या आपत्ती व्यवस्थानातील कोरोना साह्यता कक्ष, माझे कुटुंब माझी जबाबदारी अंतर्गत विविध सर्वेक्षण, विलगी करण कक्ष यात ही कार्यरत आहेत हे करत असताना ऑनलाईन अध्ययन- अध्यापनाची साप्ताहिक माहिती लिंक वर भरण्या संदर्भात परिपत्रक काढले आहे, हि माहिती लिंक वर माहिती भरावयास लावणे म्हणजे शिक्षक व शिक्षण प्रक्रियेतील अधिकारी यांच्यावर अविश्वास दाखवल्याची भावना निर्माण झाली आहे. या मुळे अध्ययन -अध्यापन माहीती भरण्याचे आदेश रद्द करावेत अशी मागणी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीने करण्यात आली आहे.आदेश रद्द नाही केल्यास या प्रक्रीयेवर बहिष्कार घालणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे प्रदेशाध्यक्ष बाळकृष्ण तांबारे यांनी दिली आहे.
निवेदनात पुढे असे म्हटले आहे की,सद्य स्थितीत राज्यात ग्रामीण भागात विद्यार्थी शिक्षणा पासून वंचित राहू नये म्हणून "शाळा बंद शिक्षण सुरु" या उपक्रम अंतर्गत राज्यातील शिक्षक प्राप्त परीस्थितीत ऑनलाईन अध्यापन करत आहेत. यामध्ये झूम, गुगल मिट या सारख्या नवीन तंत्रज्ञानाचा वापर करीत विद्यार्थ्याना अध्यापन करत आहेत.विद्यार्थ्यांना व्हाटसअप च्या माध्यमातून ग्रुप तयार करून त्यांचा अभ्यास देणे व तपासणेही चालू आहे, तसेच काही शिक्षकांनी स्वाध्याय पुस्तिका विकसित करून विद्यार्थ्यापर्यंत पोहोच केल्या आहेत. असे विविध शैक्षणिक उपक्रम सुरु असताना शिक्षक शासनाच्या आदेशानुसार कोविड प्रतिबंधात्मक कामकाजात ही प्रभावीपणे कार्यरत आहेत .या कामामुळे राज्यातील अनेक शिक्षकांना कोरोना संसर्गही झाला आहे.
शिक्षकांना कोविड १९ च्या कामकाजातून कार्यमुक्त करणे संदर्भात शालेय शिक्षण विभागाने आदेश काढून स्थानिक प्रशासनाला शिक्षकांना कार्यमुक्त करणेची सूचनाही दिलेली आहे परंतु त्यानुसार राज्यातील शिक्षकांना कार्यमुक्त तर करण्यात आलेच नाही तरीही शिक्षक आपत्ती व अध्यापन दोन्ही हि जबाबदारी पार पाडत आहेत. अशा परिस्थितीत ऑनलाईन साप्ताहिक माहिती भरण्या संदर्भात परिपत्रक काढले आहे. या परिपत्रकाने राज्यतील १ ली ते १२ पर्यंत अध्यापन करणाऱ्या शिक्षकांत तीव्र असंतोष निर्माण झाला असून हे परिपत्रक रद्द करावे अशी मागणी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीने राज्य शासनाला केली आहे. परिपत्रक रद्द नाही केल्यास शिक्षक संघाचे नेते संभाजीराव थोरात यांच्या नेतृत्वाखाली राज्यातील सर्व प्राथमिक शिक्षक लिंक भरण्याच्या प्रक्रियेवर बहिष्कार घालणार असल्याचे अध्यक्ष बाळकृष्ण तांबारे यांनी निवेदनात म्हटले आहे. हे निवेदन मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे, , शालेय शिक्षण मंत्री प्रा.वर्षाताई गायकवाड , शिक्षण आयुक्त पुणे, शिक्षण संचालक प्राथमिक शिक्षण संचलनालय पुणे यांना पाठवले असल्याचे सांगण्यात आले आहे.
शिक्षक नेते संभाजीराव थोरात यांच्या मार्गदर्शन नेतृत्वाखाली ऑनलाईन साप्ताहिक माहिती भरण्याच्या प्रक्रियेवर बहिष्कार घालत आहे. राज्य शिक्षक संघाचे सरचिटणीस आप्पासाहेब कुल, महिला आघाडी अध्यक्षा अनुराधा तकटे ,कार्याध्यक्ष अंबादास वाजे ,कोषाध्यक्ष जनार्दन निउंगरे, विनोद राऊत, एन वाय पाटील आदी उपस्थित होते.