नायगाव येथील चोरडिया कंपनीने केलेल्या उत्खननाची सखोल चौकशी होऊन कारवाई करणार:- तहसीलदार खंडाळा.
सातारा ( प्रतिनिधी)
नायगाव येथील शेतकऱ्यांनी तहसील कार्यालयासमोर त्यांच्या जमिनीमध्ये बेकायदेशीर उत्खनन केलेल्या चोरडीया कंपनीवर कारवाई करावी, म्हणून आमरण उपोषणास बसले असताना तहसीलदार खंडाळा यांनी याबाबत पुन्हा पंचनामा करून सखोल चौकशी करून उचित कारवाई करण्याचे आश्वासन देत शेतकर्यांनी उपोषण तात्पुरते स्थगित केले आहे.
नायगाव ता. खंडाळा येथील शेतकरी संजय नेवसे ,वैशाली नेवसे, नवनाथ नेवसे यांनी जिल्हाधिकारी सातारा तसेच तहसीलदार खंडाळा यांना असे निवेदन दिले होते की, प्रवीण चोरडिया हे व त्यांचे मॅनेजर यांनी शेतकऱ्यांच्या गटातील 1251 1254 मधील शेतकऱ्यांची पूर्व संमती न घेता तसेच शासकीय कोणतीही परवानगी न घेता सर्रास बेकायदेशीरपणे अंदाधुंद जमीन उत्खनन करून शेतकऱ्यांना देशोधडीला लावण्याचा उद्योग सुरू केला आहे .या सर्व प्रकाराचा राजरोस उद्योग सुरू असून संबंधित महसूल विभागाच्या स्थानिक प्रशासन यांनी गांधीगिरी ची भूमिका घेऊन उद्योगपतींच्या दावणीला शासन बांधले आहे. या सर्व गोष्टींमुळे शेतकऱ्यांचे मरण होत असून आता आत्महत्या करण्याशिवाय पर्याय उरला नाही. तरी या प्रकरणात जिल्हाधिकारी सातारा व व तहसीलदार खंडाळा व स्थानिक प्रशासन महसूल विभागाने लक्ष देऊन शासनाचा कोट्यवधींचा महसूल वसूल करून घ्यावा आणि ते जमिनीची पूर्वस्थिती होती तशी करून द्यावी.अश्या आशयाचे निवेदन नेवसे शेतकऱ्यांनी दिले होते.
तहसीलदार खंडाळा यांनी या बाबत उचित कारवाई न केल्यामुळे दिनांक 20 सप्टेंबर 2021 रोजी नेवसे शेतकरी यांनी तहसील कार्यालय खंडाळा येथे आमरण उपोषणाला बसले होते .तातडीने तहसीलदार खंडाळा यांनी याची दखल घेत मी स्वतः पंचनामा करून उचित कारवाई करण्याचे शेतकऱ्यांना आश्वासन देऊन शेतकऱ्यांनी हे उपोषण स्थगित केले आहे.
याकामी भोर तालुका प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष संतोषराव मोहिते व प्रहार कार्यकर्त्यांनी तहसीलदार खंडाळा यांची भेट घेऊन शेतकऱ्यांचे याबाबतचे म्हणणे ऐकून घेऊन सविस्तर पुन्हा पंचनामा करावा असे असे सांगितले ,त्यावर तहसीलदार यांनी त्यांना होकार देत पुन्हा पंचनामा करण्याचे आश्वासन दिले.