ई-पिक पाहणी शेतकऱ्यांना सक्तीची करू नये:-भोर तालुका प्रहार पक्षाची मागणी.
भोर (प्रतिनिधी)
ऑफलाईन पध्दतीने पिकाच्या नोंदी ७/१२ वर घेण्याबाबत संबंधीत तलाठी व मंडळ अधिकाऱ्यांना सूचना द्याव्यात व ई-पिक पाहणी शेतकऱ्यांना सक्तीची करू नये अशी मागणी भोर तालुका प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष संतोष मोहिते व प्रहार पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी भोरचे तहसीलदार व प्रांत यांना निवेदनाद्वारे केली आहे.
शासनाच्या महसुल विभागामार्फत राज्यामध्ये इ – पिक पाहणी साठी ॲप तयार करण्यात आले असून या ॲपद्वारे शेतकऱ्यांनी ज्यांच्या शेतामध्ये पेरणी केलेल्या पिक लागवड व लागवड क्षेत्र ऑनलाईन करणे बाबत सूचना करण्यात आलेल्या आहेत. हा उपक्रम जरी चांगला असला तरी शेतकऱ्यांसाठी ती मोठी डोकेदुखी ठरत आहे. या आधी तलाठी व मंडळ अधिकारी यांच्या मार्फत शेतकऱ्याच्या पिक लागवड व लागवड क्षेत्र यांच्या नोंदी ऑफलाईन पध्दतीने घेण्यात येत होत्या. परंतू या ई – पिक पाहणीच्या ऑनलाईन नोंदणीमुळे शेतकऱ्यांना मोठया प्रमाणावर त्रास सहन करावा लागत आहे. अनेक शेतकऱ्यांकडे स्वतःचा अँड्रॉइड मोबाईल फोन नाही. ज्यांच्याकडे आहे त्या शेतकऱ्यांना ई – पिक ऑनलाईन नोंदणी करण्याचे व संबंधीत ॲप हाताळण्याचे ज्ञान अवगत नाही. त्या शिवाय ग्रामीण भागात अनेक ठिकाणी मोबाईल नेटवर्क उपलब्ध होत नाही. अशा परिस्थितीमध्ये ई-पिक पाहणी करणे शक्य नाही म्हणुन करीता ज्या शेतकऱ्यांना ई-पिक पाहणी करणे शक्य आहे त्यांनी करावे व ज्या शेतकऱ्यांना ई-पिक पाहणी करणे शक्य नाही अशा शेतकऱ्यांना ऑफलाईन पध्दतीने पिकाच्या नोंदी ७/१२ वर घेण्याबाबत संबंधीत तलाठी व मंडळ अधिकाऱ्यांना सूचना द्याव्यात व ई-पिक पाहणी सक्तीची करू नये मागणीचे निवेदन भोर तालुका प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने भोरचे तहसीलदार सचिन पाटील व प्रांत राजेंद्र कचरे यांना देण्यात आले आहे.
भोर तालुक्यात अनेक ठिकाणी तलाठी व मंडळ अधिकारी प्रशासनाचे नाव सांगुन ई पिक पाहणी नोंदणी करणे बाबत शेतकऱ्यांना सक्ती करीत आहेत. आपणास विनंती आहे की , आपण संबंधीत महसुल अधिकारी , तहसिलदार , मंडळ अधिकारी व तलाठी यांना ई – पिक पाहणी नोंदणीबाबत सक्ती करण्यात येऊ नये अशा सूचना द्याव्यात .जेणे करुन ग्रामीण भागातील निरक्षर व गरीब शेतकऱ्यांना याचा लाभ मिळल या सक्तीच्या निर्णयाबाबत प्रशासनाबद्दल शेतकऱ्यांच्या मनामध्ये तिव्र संताप आहे असे ही या निवेदनात म्हंटले आहे.
यावेळेस संतोष मोहिते ,जगन्नाथ सपकाळ ,मिलिंद तारू ,सोपान बाठे, देवेंद्र निगडे, विशाल पवार प्रहार पदाधिकारी उपस्थित होते.
( भोर तालुका प्रहार जनशक्ती पक्षाचे उपाध्यक्ष तुषार कोंडे ,उपाध्यक्ष अजय कांबळे ,सचिव सचिन गावडे, कार्याध्यक्ष सुरेश बागल, सरचिटणीस अजय गोरड, चिटणीस विशाल बाठे, प्रहार जनशक्ती पक्षाचे शेतकरी अध्यक्ष श्याम राव कोंडे ,चेतन गायकवाड, सुधीर शेडगे, गणेश निगडे ,प्रेम ताठे , बाळासाहेब शेडगे ,लक्ष्मण गायकवाड यांनी भोर तालुक्यातील शेतकरी यांच्याशी प्रत्यक्ष भेट देऊन इ पीक पाहणी बाबत मते जाणून घेतली.)