पुणे-सातारा महामार्ग 'खड्ड्यात'
खेड शिवापूर (प्रतिनिधी)
पुणे-सातारा महामार्गावर खड्ड्यांचे मोठे साम्राज्य निर्माण झाले असताना महामार्ग झाडांच्या व गवताच्या जाळ्यात ,व अतिक्रमनाच्या विळख्यात अडकलेला आहे. या मोठ्या समस्यांना नागरिकांना व प्रवाशांना अडचणींना तोंड द्यावे लागत आहे . राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण अजुनही झोपलेलच आहे.त्यामुळे वाहनचालकांना व प्रवाशांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे .हा महामार्ग प्रवाशांच्या सोयीसाठी नसून तो प्रवाशांच्या मृत्यूचा सापळा बनला आहे याचा विचार करण्याची वेळ आज आली आली आहे .प्रशासनाने याची गांभीर्याने पूर्वक दखल घेणे गरजेचे आहे प्रशासनाने याची दखल न घेतल्यामुळे वेळू येथे नागरिकांनी खड्यात वृक्षारोपण करून प्रशासनाचा तीव्र निषेध व्यक्त करत असल्याचे गोगल वाडीचे सरपंच अशोक गोगावले यांनी सांगितले.
वेळू ता. भोर येथील राष्ट्रीय महामार्गाचा असणारा सर्व्हिस रोडची अत्यंत बिकट अवस्था झाली आहे. या सर्विस रोडला मोठमोठे खड्डे पडले असून वाहन चालकांना मोठी कसरत व अनेक अडचणींचा सामना करत मार्ग काढावा लागत आहे. अनेक वेळा प्रशासनाला सांगून देखील प्रशासन याकडे गांभीर्याने पाहत नाही असा आरोप नागरिकांनी केला आहे.
मागील काही महिन्यांपासून वाहनांची तुलनेने कमी वर्दळ असतानाही पुणे-सातारा महामार्गावर खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. या खड्ड्यांमुळे वाहतुकीला प्रचंड अडथळा होत असून, अपघाताची परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाची (एनएचएआय) यावर आता काय भूमिका असेल, याकडे स्थानिक ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.
पुणे-सातारा रस्त्यावर शिंदेवाडी ते सारोळादरम्यान खड्डे पडलेले आहेत. वेळू, शिवरे, वरवे, चेलाडी फाटा येथेही खड्डे आहेत. या खड्ड्यांत वाहने आदळून अपघात होण्याबरोबरच वाहनांचे नुकसान होत असल्याचे आढळून आले आहे.
महामार्गावर वर्दळ कमी असली; तरीही लगतच्या गावांतील नागरिकांना ये-जा करताना महामार्गावरून वाहतूक करावी लागते. त्यांची या खड्ड्यांमुळे गैरसोय होत आहे. याबाबत महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक सुहास चिटणीस यांच्याशी संपर्क साधला असता, तो झाला नाही.
यावेळी वेळूचे सरपंच आप्पा धनावडे, मा. सरपंच माऊली पांगारे ,राष्ट्रवादी काँग्रेसचे संघटक सरचिटणीस सोमनाथ सोमानी, वेळूचे उद्योजक हिरामण पांगारे, जीवन धनावडे ,मंगेश सूर्वे ,नवनाथ खुटवड ,माऊली मांढरे ,समीर गोगावले व नागरिक यावेळी उपस्थित होते.