कापूरहोळ( प्रतिनिधी):-विठ्ठल पवार सर.
कापूरहोळ, ता. भोर येथे महाराष्ट्राच्या पहिल्या महिला शिक्षिका आणि स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या सावित्रीबाई फुले यांची जयंती कापूरहोळ जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या सोहळ्याला विद्यार्थ्यांसह शिक्षकांचा उस्फूर्त सहभाग लाभला.
कार्यक्रमाची सुरुवात सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेच्या पूजनाने झाली. उपस्थित शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी त्यांना विनम्र अभिवादन केले. याप्रसंगी शाळेतील शिक्षकांनी आणि विद्यार्थ्यांनी सावित्रीबाईंच्या कार्यावर आधारित भाषणे सादर केली. त्यांच्या विचारांवर चर्चा करताना शिक्षण, समानता, आणि स्त्रीशक्तीचा संदेश देणारे प्रेरणादायी मुद्दे मांडण्यात आले.
विशेष आकर्षण ठरले शाळेतील विद्यार्थिनींचे स्वागत! या निमित्ताने प्रत्येक विद्यार्थिनीला गुलाबपुष्प देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. यामुळे मुलींमध्ये आत्मसन्मानाची भावना निर्माण झाली.
कार्यक्रमात सावित्रीबाई फुले यांच्या कार्याची थोरवी व महती सांगणाऱ्या ओव्या सादर करण्यात आल्या. अंगणवाडी शिक्षिका अलकाताई देवघरे आणि शाळेच्या आदर्श शिक्षिका व मुख्याध्यापक सुजाता कुंभार यांनी आपल्या सुमधुर आवाजात या ओव्या सादर करून उपस्थितांची मने जिंकली. त्यांच्या सादरीकरणातून सावित्रीबाईंच्या संघर्षमय आणि प्रेरणादायी जीवनाचे चित्र उभे राहिले.
कार्यक्रमाला शाळेतील शिक्षक अनंता मोरे आणि सुवर्णा पोतदार यांची विशेष उपस्थिती होती.
त्यांनी सावित्रीबाईंच्या विचारांचा वर्तमान काळात कसा उपयोग करता येईल, यावर मोलाचे मार्गदर्शन केले.
या जयंती कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये सावित्रीबाईंच्या कार्याबद्दल आदरभाव निर्माण झाला. शिक्षण आणि समाजसेवेच्या त्यांच्या विचारांना पुढे नेण्याचा निर्धार या निमित्ताने सर्वांनी व्यक्त केला. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल शिक्षक आणि विद्यार्थ्यांचे विशेष कौतुक करण्यात आले.
संपूर्ण शाळा परिसरात सावित्रीबाई फुले यांच्या विचारांचा सन्मान आणि प्रेरणेचा उत्साह दिसून आला.