कापूरहोळ( प्रतिनिधी):-विठ्ठल पवार सर
काव्ययोग काव्य संस्था, पुणे व श्री. लक्ष्मण शिंदे, निसर्गकवी, लेखापाल पुणे वन विभाग पुणे यांच्या माध्यमातून आठवले माध्यमिक विद्यालय माळेगांव ता. भोर जि. पुणे या ठिकाणी भोर तालुक्यातील आगळा वेगळा पहिलाच उपक्रम विद्यार्थ्यांचे कवी संमेलन भरवण्यात आले होते. या कवी संमेलनामध्ये विद्यालयातील 30 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. त्यापैकी 18 विद्यार्थ्यांना त्यांनी लिहिलेल्या कवितेचे सादरीकरण करण्याची संधी देण्यात आली. सादरीकरण केलेल्या विद्यार्थ्यांमधून तीन विद्यार्थ्यांना निवडण्यात आले. सार्थक कोळी (प्रथम क्रमांक) ९वी, वैष्णवी दामगुडे(द्वितीय क्रमांक) ९वी, ईश्वरी मोरे (तृतीय क्रमांक)६वी असा क्रमांक देण्यात आला. या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र, पदक व रोख स्वरूपाचे बक्षीस देण्यात आले. तसेच सहभागी सर्वच बाल कवींचा सन्मान करण्यात आला. या कवी संमेलनामध्ये विद्यार्थ्यांनी विविध विषयावर कविता लिहिल्या व सादरीकरण ही उत्तम स्वरूपाचे केले. या कार्यक्रमात कविता कशा लिहाव्यात, कोणते विषय निवडावेत आणि कवितेला भारदस्तपणा कसा द्यावा, लिहिलेल्या कविता सादरीकरण कशा कराव्यात याचे मार्गदर्शन श्री लक्ष्मण शिंदे यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना केले. यावेळी काव्ययोग काव्य संस्थेचे योगेश हरणे यांनी सांगितले की अशा स्वरूपाच्या भोर तालुक्यात आणखी शाळा निवडून, अशी विद्यार्थ्यांची कवी संमेलन घेऊन या कवी संमेलना मधून विद्यार्थी निवडून जिल्हास्तरीय कवी संमेलन घेण्याचे आयोजन करण्यात येणार आहे. यावेळी संस्थेचे गौरव पुंडे व ग्रामीण कवी श्री राम घडे तसेच शाळेचे सर्व शिक्षक वृंद व विद्यार्थी हजर होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री विक्रम कदम यांनी केले. आभाराचे शब्द श्री सोनवणे सर यांनी व्यक्त केले.
"(श्री. लक्ष्मण शिंदे, निसर्ग कवी यांनी सांगितले की, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना कविता कशा लिहाव्यात, सादरीकरण कसे करावे यासाठी ग्रामीण भागामध्ये विद्यार्थी कवी संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. कविता लिहिण्यासाठी व सादरीकरणाची संधी मिळाल्यामुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर वेगळाच आनंद दिसून येत होता".)