करंदी खे.बा.येथील प्राथमिक शाळेत आयोजित माता पालक सभेत ‘निपुण भारत’ आणि ‘रचना प्रेरणा’ उपक्रमांची सविस्तर माहिती मातांना देण्यात आली. मुलांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी पालकांचा सक्रिय सहभाग वाढविणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश असल्याचे मुख्याध्यापक मिनिल कांबळे यांनी सांगितले.
रचना संस्थेच्या माधुरी उंबरकर यांनी पालकांना ‘अभ्यास कोपरा’ संकल्पनेचे महत्त्व समजावून सांगितले. मुलांच्या शैक्षणिक प्रवासात पालकांनी सहभाग घेऊन हातभार लावण्याचे आवाहन त्यांनी केले.
शाळेतील शिक्षक आणि रचना टीमच्या कार्यकर्त्यांनी इयत्ता पहिली ते तिसरीच्या पालकांसाठी ‘निपुण भारत’ उपक्रमाची माहिती दिली. मुलांच्या वाचन, लेखन, आणि गणितीय कौशल्यांच्या विकासासाठी या उपक्रमाचा कसा उपयोग होऊ शकतो, याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.
सभेत दृकश्राव्य माध्यमाचा वापर करून पालकांना घरी मुलांसाठी उपक्रम कसे राबवायचे, याची माहिती देण्यात आली. तसेच, तानाजी नाईलकर, सुजाता तळेकर, शाम हेरगिडे, पंकज राठोड, आणि करिष्मा बोडके यांनी पालकांना मुलांना सर्वांगीण मार्गदर्शन कसे करावे आणि त्यांच्या शिक्षणाला अधिक परिणामकारक कसे बनवायचे, याबाबत मार्गदर्शन केले.
या सभेला मोठ्या संख्येने पालक उपस्थित होते. पालकांनी या उपक्रमाचे कौतुक करत शाळेच्या प्रयत्नात नियमित सहभागी होण्याचे आश्वासन दिले.
सभेला रचना संस्थेचे श्रीपाद कोंडे, मयुरी पवळे, करिष्मा बोडके, शुभांगी घाडगे, आणि जयश्री वाल्हेकर हे कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रमाचे समारोप श्याम हेडगिरे सर यांनी आभारप्रदर्शन करून केला.