राजगड( प्रतिनिधी):-●विठ्ठल पवार सर●
स्वामी विवेकानंद जयंती व राष्ट्रीय युवक दिनाचे औचित्य साधून कै. शिवाजी शिंदे पब्लिक ट्रस्ट, भारती विद्यापीठ सामाजिक शास्त्र विभाग, आणि एच. व्हि. देसाई नेत्र रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने नेत्ररोग तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर आयोजित करण्यात आले.
या शिबिरामध्ये एकूण 91 रुग्णांची तपासणी करण्यात आली, त्यापैकी 24 रुग्णांना मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी पुणे येथे पाठविण्यात आले, तर 34 रुग्णांना माफक दरात चष्मे वाटप करण्यात आले. लव्ही, मेरावने, मंजायअसणी, वाजेघर, विंझर, वांगणी, मांगदरी, अंबावने, व करंजवाने येथील नागरिकांनी या उपक्रमाचा लाभ घेतला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नवनिर्वाचित आमदार शंकर भाऊ मांडेकर होते. त्यांच्या हस्ते रुग्णांना चष्मे वाटप करण्यात आले. यावेळी मांडेकर यांनी शिवाजी शिंदे पब्लिक ट्रस्टच्या कामाचे कौतुक करत, हे कार्य समाजासाठी प्रेरणादायी असल्याचे मत व्यक्त केले.
कार्यक्रमाला अमोल नलावडे, प्रताप शिळीमकर, किरण राऊत, संदीप खुटवड, अर्जुन भिलारे, सरपंच अलका शिंदे, स्वप्नील कांगडे, मकरंद चावट आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे आयोजन करणाऱ्या शिवाजी शिंदे पब्लिक ट्रस्टचे अध्यक्ष शेखर शिंदे यांनी ट्रस्टच्या वर्षभरातील सामाजिक उपक्रमांची सविस्तर माहिती पाहुण्यांना दिली आणि आभार मानले.
शिबिराच्या यशस्वी आयोजनाबद्दल नागरिकांतून समाधान व्यक्त करण्यात आले असून, अशा उपक्रमांची वारंवार आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले.